मिरजेतील बावाच्या विहिरीत आढळला ऐतिहासिक शिलालेख, गिरीगोसावी समाजाच्या योगदानाची शिलालेखात माहिती
मिरजेतील बावाच्या विहिरीत आढळला ऐतिहासिक शिलालेख, गिरीगोसावी समाजाच्या योगदानाची शिलालेखात माहिती
शहरातील जुन्या कळंबी रस्त्यानजीक आगट मळ्यातील बावाच्या विहिरीत 1844 सालचा शिलालेख आढळून आला आहे. कृष्णा घाटावरील कमलेश्वर मंदिरासाठी दिलेल्या इनाम जमिनीत गणेशगिरी गोसावी यांनी पाच मोटांची ही विहीर बांधल्याचा उल्लेख या शिलालेखात करण्यात आला आहे. गिरी संप्रदायातील गोसावी समाजातील लोकांनी मिरज शहर आणि परिसरात केलेल्या कामांची माहिती या शिलालेखातून होत असल्याची माहिती मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी दिली.
सांगलीकर मळ्याच्या मागील बाजूस सुभाषनगरच्या दिशेने जाताना जुन्या कळंबी रस्त्यावर बावाची विहीर नावाची एक प्रसिद्ध विहीर आहे. हा भाग आगट मळा म्हणूनही ओळखला जातो. या मळ्यात या विहिरीच्या काठावर दुर्मिळ अशा गोरख चिंचेचे भलेमोठे झाड आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभ्यासकांना या विहिरीत एक शिलालेख आढळून आला. विहीर गिरी संप्रदायातील गोसावी समाजाच्या लोकांनी बांधली. मिरजेत गिरी संप्रदायाच्या गोसावी समाजाची मोठी वस्ती होती. त्यांचे मठ शहरात होते. या लोकांनी मिरजेच्या धार्मिक आणि सार्वजनिक कार्यात मोठे योगदान दिल्याचे दिसते. यांच्यापैकी मनसागिरी, भवानगिरी आणि गणेशगिरी हे साधू होऊन गेले. त्यांनी शनिवार पेठेत बुवाचा हौद बांधला. तेथेच जवळच त्यांचा मोठा मठ होता. हे गोसावी सावकार होते. उंची कापडांचा व्यापार ते करीत. प्रसंगी सरदार-जहागीरदारांना व्याजाने पैसे देत.
कमलेश्वराच्या इनाम जमिनीत बांधली विहीर
गिरी संप्रदायातील गोसाव्यांच्या समाध्या कृष्णा घाटावर आहेत. याच गिरी गोसावी समाजातील मनसागिरी गोसावी यांनी 1839 साली मिरजेत कृष्णा नदीकाठी कमलेश्वराचे सुंदर मंदिर बांधले. या मंदिराच्या नेवैद्य, नंदादीपाचा खर्च चालावा म्हणून संकेश्वर मठाच्या शंकराचार्यांनी 1839 साली मिरजेतील जुन्या कळंबी रस्त्यावर, सांगलीकर मळय़ाच्या मागे मनसागिरी बावांना मोठी इनाम जमीन दिली. या जमिनीत पीक घेण्यासाठी पाणी हवे म्हणून विहीर बांधणे आवश्यक होते. त्यामुळे मनसागिरी बावांचे शिष्य गणेशगिरी यांनी सन 1844 मध्ये पाच मोटांची विहीर बांधली. या विहिरीत शिवलिंग आणि गणेशमूर्ती आहे. आत उतरण्यासाठी पायऱया आहेत.
1844 सालचा शिलालेख
या विहिरीचा अभ्यास करीत असताना मिरज इतिहास संशोधक मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांना 12 ओळींचा देवनागरीमधील शिलालेख आढळून आला. विहीर बांधकामासंदर्भातील हा शिलालेख असून, या शिलालेखातून गिरी संप्रदायाच्या कार्याची माहिती होणार आहे. पाणी टंचाईच्या काळात या विहिरीने अनेकांना जीवनदान दिले आहे. त्यामुळे ही विहीर जतन करायला हवी.
काय आहे शिलालेखात?
या शिलालेखात ‘स्वस्ती श्रीनृप शालिवाहन शके 1761 विकारी संवछरे चैत्र मासी श्री स्वामी मठ संकेश्वर याणी तपोनिधी मनसागिरी बावा मठ मीरज यास इनाम जमीन श्री कमळेश्वराचे देवालय कृष्णातीरी बांधले. त्यास नेवैद्य नंदादीपाबदल दिली. त्यात मळा करावयाकरिता विहीरी चिरेबंदीचे काम चालू केल़े पाच मोटांची वी. ची. गणेशगीर याणी काम शके 1766 क्रोधी संवछरी मासी तयार केले,’ असा उल्लेख आहे.



Comments
Post a Comment